मुंबई, दि. १६ जून २०२० : कोविड -१९ च्या संकटामुळे मुंबई मधील सर्व रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. जवळपास ८२ दिवस मुंबईची लोकल थांबली होते. मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी मुंबई लोकल काल पुन्हा रुळावर धावली. मात्र लोकलची ही सेवा केवळ अत्यावश्यक सुविधा व त्यांच्याशी निगडित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे.
या लोकल पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर धावणार आहेत. पश्चिम रेल्वेने ही सेवा १५ जून रोजी सुरू होणार अशी माहिती दिली होती त्या अंतर्गत कालपासून पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून ७३ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. या लोकल सकाळी ५.३० ते रात्री ११.३० पर्यंत धावणार आहेत. यामध्ये १५ मिनिटांची विश्रांती घेतली जाईल.
लोकलची होणारी ही वाहतूक विशेषत: चर्चगेट ते विरार या स्टेशनांमध्ये होणार आहे. पण काही लोकल मात्र डहाणूवरून ही धावतील. यामध्ये चर्चगेट ते बोरिवली या दरम्यान ही लोकल जलद गतीने धावणार आहे. तर बोरिवलीच्या पुढे धीम्या गतीने धावेल. या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते कसारा / कर्जत / कल्याण / ठाणे या मार्गावर १३० फेऱ्या होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी