मुंबईसाठी अद्ययावत पूर-इशारा प्रणालीचा प्रारंभ

मुंबई, दि. १२ जून २०२०: मुंबईसाठी पुराचा इशारा देणाऱ्या अद्ययावत एकात्मिक अशा ‘IFLOWS-मुंबई’ या प्रणालीचा आज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे आणि केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एकत्रितपणे प्रारंभ केला.

मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाच्या वेळी मुंबईतील पाणी वाढण्याविषयी म्हणजे पूरस्थितीविषयी पूर्वसूचना देऊन, बचावाच्या दृष्टीने शहराला अधिक समर्थ करणे, या प्रणालीमुळे शक्य होणार आहे. या प्रणालीचा वापर करून ३ दिवस आधी पुराचा अंदाज वर्तविणे आणि ३ ते ६ तासांपर्यंतच्या तत्कालीन अंदाजासह तसे भाकीत वर्तविणे शक्य होणार आहे. विशेषकरून, सखल भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची गरज उत्पन्न होणार असल्यास, याचा निश्चित उपयोग होईल, कारण ,एखादा विशिष्ट भाग पाण्याखाली जाणार असल्याचा अंदाज आपणास १२ तास अगोदरच कळू शकेल. प्रत्येक लहान-लहान भागातील पावसाच्या प्रमाणाचाही अंदाज या प्रणालीमुळे कळू शकेल.

या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी, पूर-इशारा प्रणाली विकसित करणाऱ्या केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. “विज्ञानाबाबत आपण जगातील कोणाहीपेक्षा कणभरही मागे नाही” अशी अभिमानाची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. “मुंबईची पूरस्थिती- विशेषतः २००५ आणि २०१७ मधील अवस्था सर्वांच्याच स्मरणात आहे. आता ही अत्याधुनिक पूर-इशारा प्रणाली मात्र मुंबईकरांच्या मदतीला धावून येणार आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “भूविज्ञान मंत्रालयानेच तयार केलेली अशाच प्रकारची प्रणाली चेन्नईमध्ये यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली आहे.” असेही ते म्हणाले.

“भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेली त्सुनामीसाठीची पूर्वसूचना प्रणाली ही संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट अशी आहे, आणि तिने याबाबत कधीही चुकीचा धोक्याचा इशारा दिलेला नाही” असे प्रतिपादनही डॉ.हर्षवर्धन यांनी केले. हिंदी महासागर क्षेत्रातील अन्य देशांपर्यंत या प्रणालीची सेवा विस्तारित करण्यात आली असून, त्यांना याचा मोठा फायदा होत आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी ‘ भूविज्ञान मंत्रालयाने विकसित केलेली ही अद्ययावत अशी पूर-इशारा प्रणाली म्हणजे मुंबईकरांसाठी एक अनोखी भेट असल्याची ‘ भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे उभे राहिलेले आरोग्यसंकट आणि नुकत्याच येऊन गेलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रक्त-व्यवस्थापन आणि पूर-व्यवस्थापन दोन्हीना सारखेच महत्त्व आहे, असेही ते म्हणाले. राज्यात निसर्ग चक्रीवादळाचे आणि मोसमी पावसाचे अचूक भाकीत वर्तविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भूविज्ञान मंत्रालयाचे आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. हवामानशास्त्र विभागाने निसर्ग चक्रीवादळाचा अगोदरच अंदाज दिल्याने, आपत्तीचा आणखी मोठा फटका बसण्यापासून आणि आणखी जीवितहानी होण्यापासून राज्याला वाचविणे राज्य सरकारला शक्य झाले, असेही ते म्हणाले.

ही अंदाज-प्रणाली कशी काम करते ?

हे आय-फ्लोज मॉड्यूलर रचनेवर तयार केले गेले आहे आणि त्यात डेटा एकीकरण, पूर, जलप्रलय, असुरक्षा, जोखीम, प्रसार मॉड्यूल आणि निर्णय पाठिंबा प्रणाली अशी सात मॉड्यूल आहेत. या प्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ), भारतीय हवामान विभाग (आयएमडी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटोरॉलॉजी (आयआयटीएम), यांनी तयार केलेल्या रेन गेज नेटवर्क स्टेशनवरील फील्ड डेटा, बृहन्मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) आणि आयएमडी, एमसीजीएम द्वारे प्रदान केलेल्या भू-वापरावरील पायाभूत सुविधा आदी समाविष्ट केल्या आहेत. हवामानाच्या मॉडेलच्या माहितीच्या आधारे, हायड्रोलॉजिकल मॉडेल्सचा वापर पर्जन्यवृष्टीच्या रूपरेषेत बदल करण्यासाठी आणि नदी प्रणालींना तो प्रवाह प्रदान करण्यासाठी केला जातो.

हायड्रॉलिक मॉडेल्सचा उपयोग अभ्यासाच्या क्षेत्रात पुराचे मूल्यांकन करण्यासाठी पाण्याच्या हालचालीची प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रवाहाच्या गतीची समीकरणे सोडविण्यासाठी केला जातो. मुंबई समुद्राशी जोडलेले आणि सात बेटांनी मिळून तयार झालेले एक शहर असल्याने शहरावरील भरती आणि वादळाचे परिणाम मोजण्यासाठी हायड्रोडायनामिक मॉडेल आणि वादळ वृद्धी मॉडेलचा उपयोग केला जातो. या प्रणालीमध्ये शहरातील गटारे शोधण्याची आणि पूरक्षेत्रांचा अंदाज बांधण्याची तरतूद या प्रणालीमध्ये आहे. एमसीजीएम आणि आयएमडी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीसीआरने मिठी, दहिसर, ओशिवरा, पोइसर, उल्हास, तलाव आणि खाडी या सर्व नद्यांमधून बैथीमीटरी माहिती एकत्र केली आहे. भू स्थालाकृती, भू वापर, पायाभूत सुविधा, लोकसंख्या इत्यादी एमसीजीएमने पुरविलेल्या आणि जीआयएसमधील संकल्पनात्मक थरांचा वापर करून प्रभाग स्तरावरील पूर पातळीचा अचूक अंदाज लावण्यासाठी याला निर्णय समर्थन प्रणालीशी जोडले आहे. पुरामुळे होणाऱ्या घटकांच्या असुरक्षा आणि जोखमीची गणना करण्यासाठी वेब जीआयएस आधारित निर्णय समर्थन प्रणाली तयार केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा