मुंबईत होणार तृतीय पंथीयांसाठी स्वच्छतागृह

मुंबई : मुंबईतील तृतीयपंथीयांसाठी वेगळे स्वच्छतागृह बांधण्याचा विचार करत असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केले असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई महापालिकेकडून ‘राइट टू पी’च्या रेट्यानंतर महिलांसाठी स्वतंत्र शौचालये व मुताऱ्या बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगांसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये व मुताऱ्या बांधल्यास हजारो तृतीयपंथीयांना दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील तृतीय पंथीयांसाठी शौचालये व मुताऱ्या नसल्यानं त्यांची मोठी गैरसोय होते, असा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल यांनी महापालिकेनं बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी केली होती.

मुंबईत पुरुषांसाठी शौचालये व मुताऱ्या आहेत. मात्र, महिलांसाठी ही व्यवस्था खूपच कमी असल्यानं नोकरदार आणि विविध कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना त्यामुळं अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. महिलांचा हा प्रश्न घेऊन मागील काही वर्षांत ‘राइट टू पी’ चळवळीनं जोर धरला.
महापालिका व सरकारशी संघर्ष करून महिलांच्या शौचालय व मुताऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करून घेतली आहे.
भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल यांच्या या सूचनेस महापालिकेनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वतीने तृतीय पंथीयांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याने तृतीय पंथीयांना दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या वतीनं विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयानं गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली जाते. या सर्व शौचालयांचं व्यवस्थापन संबंधित संस्थांच्या माध्यमातून करण्यात येतं.
सध्या स्वच्छतेअभावी त्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे, अशी माहिती ‘राइट टू पी’ कडून देण्यात आली आहे. तृतीयपंथीय आणि इतर असा भेदभाव होऊ नये. यासाठी तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयं न बांधता असलेल्या शौचालयांमध्ये त्यांचा समावेश करावा. तसेच, मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालयांमध्ये तृतीय पंथीयांसाठी शौचकुपं, मुताऱ्या ठेवायला हव्यात, अशी मागणी ‘राइट टू पी’च्या कार्यकर्त्या सुप्रिया जाण यांनी केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा