मुंबई : मुंबईच्या महापौरपदी पुन्हा एकदा पालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार असल्याची चिन्ह निर्माण झाले आहे. महापौर पदासाठी २२ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. यावेळी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण असल्याने इच्छुकांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
राज्यातील २७ महानगरपालिकांमधील महापौरपदाची पहिल्या अडीच वर्षांची मुदत २१ नोव्हेंबरला संपत असल्याने बुधवारी मंत्रालयातून आरक्षण जाहीर करण्यात आले.
यामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी सलग दुसऱ्यांदा खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले. त्यामुळे पालिकेच्या सर्व २२२ नगरसेवकांना महापौरपदासाठी अर्ज करण्याची संधी आहे.
गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. २२ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत इच्छुकांना संबंधित पालिकेच्या चिटणीस खात्याकडे अर्ज सादर करता येणार आहे.