वडगाव बुद्रुक, पुणे १६ फेब्रुवारी २०२५ : सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक आणि प्रयेजा सिटी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे सुरू असलेल्या अनधिकृत आरसीएम प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या अनधिकृत प्लांटमुळे परिसरात धूळ आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सिमेंटच्या धुळीमुळे नागरिकांना श्वासोच्छ्वासाचे विकार, त्वचेचे रोग आणि इतर गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि महिला या धोक्याला अधिक बळी पडत आहेत. काही दिवसांपूर्वी याच धुळीमुळे झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, ही परिस्थितीची गंभीरता दर्शवते.
प्रयेजा सिटी आणि आसपासच्या रस्त्यांवर सिमेंटचा थर साचला आहे. गाड्यांवर आणि सौर ऊर्जा पॅनलवर धूळ जमा झाल्यामुळे गैरसोय होत आहे. महापालिकेने या प्लांटला नोटिसा बजावल्या, परंतु त्या नोटिसांना केराची टोपली दाखवत प्लांट अजूनही सुरू आहे. स्थानिक आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या भागात अवजड वाहनांची सततची ये-जा असते, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने लावलेले बॅरिकेड्स तोडून टाकण्यात आले आहेत, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
नागरिकांनी या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली आहे. त्यांनी अनधिकृत आरसीएम प्लांट बंद करण्याची, रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबवण्याची, नियमित स्वच्छता करण्याची आणि रस्ता रुंदीकरणाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.
परंतु, नागरिकांच्या या तक्रारींकडे स्थानिक आमदार आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. चार वर्षांपासून या समस्येवर कोणताही उपाय काढण्यात आलेला नाही. महापालिकेचे अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर काहीच कारवाई करत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.
या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत. प्रशासनाने यावर वेळीच लक्ष दिले नाही, तर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे, याची जबाबदारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवरच राहील, असा नागरिकांनी इशारा दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे