अहमदपूर (जि. लातूर), २८ नोव्हेंबर २०२२ : अहमदपूर शहरातील चोरटांगी येथे जवळपास ३० वर्षांपासून अतिक्रमण करून दुकाने उभारण्यात आली होती. दरम्यान, पालिकेने नोटिसा बजावून रविवारी अतिक्रमण केलेली ८६ दुकाने हटविली आहेत. यामुळे हा परिसर खुला झाला आहे.
शहरातील बसस्थानकासमोरील अतिक्रमण हटवून तेथील व्यापाऱ्यांना जवळपास ३० वर्षांपूर्वी चोरटांगी येथे व्यवसायासाठी जागा दिली होती. तिथे ८६ दुकानदार आपला व्यवसाय करीत होते. दरम्यान, या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यात येणार असल्याचे सांगत पालिकेने या दुकानदारांना नोटिसा बजावल्या होत्या.
चोरटांगी रोडवरील दुकानदारांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत म्हणून दोन दिवसांपासून नगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत होते .
अतिक्रमण काढून न घेतल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असेही बजावले होते. अखेर रविवारी पालिकेने ही अतिक्रमणे हटविली आहेत.
दरम्यान, शहरातील या व्यापाऱ्यांनी आम्हाला व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. पालिकेने केलेल्या कारवाईमुळे रस्ता खुला झाल्याचे पाहावयास मिळाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजमोहम्मद शेख