खेड, दि. ७ ऑगस्ट २०२०: खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द गावाच्या हद्दीत कौटुंबिक वादातुन स्वतःच्या पत्नीला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाचा सासरा आणि मेहुण्याने हत्याराने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू असल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास वडगाव रस्त्यावरील विश्रांत वड भागात लक्ष्मी नगरमधील संजय एकनाथ आहेर यांच्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत घडली आहे.
उदय सुनील लोखंडे वय ३५ असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. उदय यांच्या आईने श्रीमती अरुणा सुनील लोखंडे यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरा हनुमंत ज्ञानोबा सोनवणे व मेहुणा किरण हनुमंत सोनवणे रा. कोडीत, ता. पुरंदर. सध्या रा. भैरोबा नाला, हडपसर आणि इतर नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उदय आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणांवरून भांडण होत होते. उदयला दारूचे व्यसन होते. त्यावरूनही पती – पत्नीमध्ये भांडण होत होते. उदयची पत्नी आणि आरोपी यांचे म्हणणे होते की, उदय आणि त्याच्या पत्नीने वेगळे राहावे. मात्र, वारंवार होत असलेल्या भांडणावरून आरोपींनी उदय यांच्यावर हत्याराने हल्ला केला. उदय यांच्या डोक्यात, हातापायावर, पाठीवर, कानाजवळ गंभीर दुखापत करून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे