मुसळधार पावसाने नाशिक पोलीस स्टेशनमध्ये शिरले पाणी

नाशिक, दि.१४ जून २०२० : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सलग दुसऱ्या दिवशीही नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे चार तास झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे शहराचा बहुतांशी भाग हा जलमय झाला होता.

या पावसाच्या पाण्याचा फटका नाशिक रोड पोलिस स्टेशनलाही बसला. बिटको चौकातील नाशिक रोड पोलिस स्टेशनच्या डीबी इन्चार्ज रूममध्ये पावसाचे पाणी शिरले. या रूममध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती.

सायंकाळी पाच वाजता आलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी पाणी साचले . जेलरोड दत्तमंदिरपासून बिटको चौक पर्यंतचा भाग हा काहीसा उतारणीचा असल्याने संपूर्ण पाणी हे बिटको चौकात जमा झालं.

यंदाच्या वर्षी नालेसफाई झालेली नसल्याने पाणी जायला जागा नसल्याने हे पाणी थेट नाशिक रोड स्टेशनच्या डी बी रूममध्ये घुसले. अचानक आलेल्या या पाण्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली रूम मध्ये असलेल्या वस्तू सांभाळायच्या की पाणी काढायचं हा मोठा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या समोर उभा राहिला.

हे पाणी पुढे शिवाजी पुतळ्यापर्यंत साचलेले होते यात वाहनचालकांनी मोठी कसरत करून पाण्यातून आपले वाहन बाहेर काढले.

त्याचप्रमाणे अशोका मार्ग येथेही ही जवळपास गुडघाभर पाण्यातून नागरिकांना चालत जावे लागले . इथेही ही रस्ता दिसत नसल्यामुळे चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. एकूणच काय तर पहिल्याच पावसात पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या मान्सून पूर्व नालेसफाईचा पूर्णपणे फज्जा उडालेला आहे.

अद्यापही संपूर्ण पावसाळा जायचा असून सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या पावसाने पाणी साचल्याने शहर परिसर जलमय झाला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा