पुणे, २८ फेब्रुवारी २०२३: जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गेल्या २४ तासांत मस्क यांच्या मालमत्तेत वाढ झाल्यानं एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर झालीय. आतापर्यंत पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीवर बसलेले फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट १८५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.
एका दिवसात इतकी वाढली संपत्ती
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, एलोन मस्क यांच्या संपत्तीत २४ तासांत ६.९८ अब्ज डॉलरची वाढ झालीय. यासह त्यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं. गेल्या काही दिवसांपासून मस्क यांच्या मालमत्तेतील तेजी पाहता ते लवकरच पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत होऊ शकतात, अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या.
डिसेंबरमध्ये घसरले दुसऱ्या क्रमांकावर
गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये २०२१ पासून टॉप-१० अब्जाधीशांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या एलोन मस्क यांना मागं टाकून बर्नार्ड अर्नॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. वास्तविक, गेले वर्ष मस्क यांच्यासाठी खूप वाईट ठरले. ४४ अब्ज डॉलर ट्विटर डीलच्या सुरुवातीपासून, त्यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये जोरदार घसरण सुरू झाली आणि ती वर्षाच्या शेवटपर्यंत चालू राहिली.
यंदा केली इतकी कमाई
गेल्या वर्षी, जिथं इलॉन मस्क सर्वाधिक संपत्ती गमावण्याच्या बाबतीत शीर्षस्थानी होते, त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीपासून, त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळं, निव्वळ संपत्तीमध्ये वाढ झाली, जी अजूनही सुरू आहे. या वर्षी आतापर्यंत इलॉन मस्क यांच्या संपत्तीत ५०.१ बिलियन डॉलरची वाढ नोंदवण्यात आलीय. तथापि, पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत २३.३ अब्ज डॉलरची वाढ झालीय.
न्युज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे