माझा महाराष्ट्र शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे: उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ३० मे २०२०: विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता इत्यादी उपस्थिती होते.

एकाही विद्यार्थ्याला कोविड -१९ चा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्या. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपविली पाहिजे. त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पहा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या.

कोविड -१९ विषाणूच्या संकटातील संधी मानून महाराष्ट्रातील प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यातील प्रादेशिक विषमता संपविण्यासाठी प्रयत्न करण्यासह नव्या शिक्षण पद्धतीबाबत संशोधन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संकटाचे संधीत रुपांतर

कोविड -१९ च्या संकटामुळे सगळ्याच गोष्टी पुढे गेल्या. अगदी आर्थिक वर्षही पुढे गेले. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु करायचे याबाबतही विविध प्रस्ताव तयार करणे सुरू आहेत. पण, आता परीक्षांबाबतच्या अनिश्चितता संपविण्याचा विषय प्राधान्याने हाताळावा लागणार आहे. केरळ आणि गोवा राज्यातील परिस्थितीही आटोक्यात आली असे म्हणता म्हणता बदलली. आपल्याकडे मुंबई, पुणे आणि औरंगाबादची परिस्थितीही सतत बदलती आहे. त्यामुळे या संकटाचे संधीत रुपांतर करण्यासह त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याचा विचार करायला हवा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

नव्याने समीकरणे जुळविण्याची वेळ आलीय. अनेक हुशार विद्यार्थी परीक्षा वेळेवर होऊ शकलेल्या नाहीत म्हणून चिंतेत आहेत. त्यामुळे पर्यायांचा आणि नेमक्या पद्धतीचा विचार करू अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिक्षणाकडेही जीवनावश्यक म्हणून पहावे लागेल

परदेशात ज्या पद्धतीने शिक्षण चालते. खास करून विद्यापीठांमध्ये कसे शिकवले जाते. त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याठिकाणची शिक्षण पद्धती आपल्याकडे कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्याची गरज आहे. त्याचबरोबर शिक्षणाकडेही जीवनावश्यक म्हणून पहावे लागेल. महाराष्ट्रात शिक्षणाच्या दर्जामध्ये सगळीकडे समानता असायला पाहिजे. शिक्षण सुलभ कसे करता येईल यावर जोर द्यावा लागले. असे मत त्यांनी मांडले.

माझा महाराष्ट्र शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे

ग्रामीण भागातील गुणी विद्यार्थ्याला परिस्थितीमुळे मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी शिकता आले नाही म्हणून अन्याय होऊ नये, अशी व्यवस्था तयार करायला हवी. शिक्षणाचा दर्जा उंचावून त्याला संधी द्यायला हवी. साक्षरतेचे प्रमाण कसे वाढविता येईल, त्या दृष्टीने पाऊले टाकावी लागतील. आदिवासींपर्यंतही शिक्षणाच्या चांगल्या सुविधा पोहोचविता आल्या पाहिजेत. शिक्षणाचा दर्जा उंचावून तो एकसमान असायला हवा. तो सर्वोत्तमच असायला हवा. माझा महाराष्ट्र शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा