नागपूर २५ जून २०२३: नागपूरच्या सायबर पोलिसांनी एका फसवणुकीच्या तपासादरम्यान, क्रिप्टोकरन्सीद्वारे गुन्ह्याची रक्कम एका चिनी नागरिकाकडे हस्तांतरित केल्याचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी मुंबई, गुजरात आणि राजस्थानमधील सहा जणांना अटक केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अटक करण्यात आलेल्या सहापैकी तीन जण मुंबई आणि उपनगर नालासोपारा येथील रहिवासी आहेत, तर इतर राजस्थान आणि गुजरात (सुरत) येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी मुंबईतून आकाश तिवारी आणि रवी वर्मा, नालासोपारा येथून संतोष मिश्रा, सुरतमधून मीत व्यास आणि राजस्थानमधून अंकित ताटेर आणि अरविंद शर्मा यांना अटक केली.
अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी १९ डेबिट आणि क्रेडिट कार्ड, नऊ मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि ७.८७ लाख रुपये रोख जप्त केले आहेत. याशिवाय, पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यातून ३७.२६ लाख रुपये जप्त केले आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की संपूर्ण गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय दुवे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड