नागपुरात तरुणाची आत्महत्या, पाचपावली पोलीस ठाण्यासमोर मृतदेह घेऊन कुटुंबीयांनी केला गोंधळ

64

नागपूर, २२ सप्टेंबर २०२३ : बहुजन समाज पक्षाचे माजी नगरसेवक नरेंद्र वालदे यांच्या मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली. आता या घटनेनंतर वाद निर्माण झाल्याने, मृताच्या कुटुंबीयांनी तरुणाचा मृतदेह पाचपावली पोलीस ठाण्यासमोर ठेवून निदर्शने केली. सासरे रवी गजभिये आणि त्यांच्या अन्य पोलीस सहकाऱ्यांनी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. शंतनू वालदे असे मृत तरुणाचे नाव आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शंतनूचे सासरे पाचवली पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार आहेत. काही दिवसांपूर्वी रवी गजभिये यांनी अन्य काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने शंतनूला बेदम मारहाण केली होती, एवढेच नाही तर यानंतर पाचपावली पोलीस ठाण्यात शंतनूवर खोटा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या संपूर्ण घटनेने शंतनूला अपमानास्पद वाटत होते आणि तो तणावाखाली होता. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारी असलेले सासरे रवी गजभिये आणि त्यांच्या अन्य पोलीस सहकाऱ्यांनी शंतनूला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप वालदे कुटुंबीयांनी केला. अटकेनंतर काल जामिनावर सुटका झाल्यानंतर शंतनूने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

आज शंतनूच्या मृतदेहासह त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानि नागरिकांनी पाचपावली पोलीस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने केली. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दोषी पोलिसांवर तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही काळ तणाव निवळला. या घटनेने पाचपावली पोलीस ठाणे परिसरात खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड