नाशिक जिल्ह्यात १२०० मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध

नाशिक, दि.२७ मे २०२०:नाशिक जिल्ह्यात प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबियांना मोफत तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. या करता नाशिक जिल्ह्याला १२०० मेट्रिक टन तांदूळ मिळाला आहे. येत्या दोन दिवसात या तांदळाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली.

सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला. या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये, याकरता अन्नपूर्णा योजना तसेच अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिका धारकांना नियमित धान्यासह पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील ५० लाख लोकांनी विविध योजनेंतर्गत धान्य उचल केली आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत पॅकेजची घोषणा केली. या योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबियांनाही मोफत तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून जिल्हास्तरावर रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबियांची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात १७ हजार १५४ कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नाशिक शहर आणि मालेगाव शहराचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथील माहिती गुरुवारपर्यंत संकलित होईल. यानंतर जिल्ह्यात तांदूळ वाटप सुरू करण्यात येईल असे पुरवठा अधिकारी नरसीकर यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा