पुणे, १७ डिसेंबर २०२२ : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील वारकरी संप्रदाय संतप्त झाला आहे. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी तसेच शासनाने सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी वारकरी संप्रदायाने नाशिक येथे शुक्रवारी (ता. १६) काळाराम मंदिर ते रामतीर्थ अशी निषेध दिंडी काढून तीव्र निषेध व्यक्त केला. रामतीर्थावर कारवाईसाठी पोलिसांना निवेदनही देण्यात आले.
यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. सदर दिंडी सुषमा अंधारे यांचा निषेध करीत असून यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा समावेश नाही, असे वारकरी संप्रदायाकडून सांगण्यात आले होते. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दिनकर पाटील हे महानुभाव पंथाचे प्रतिनिधी म्हणून या दिंडीत सहभागी झाले. त्यांनीही आपण राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर महानुभाव पंथाचे प्रतिनिधी म्हणून या दिंडीत सहभागी झालो असल्याचे सांगितले.
काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून या दिंडीला टाळ-मृदंगाच्या तालावर व ‘जय हरी विठ्ठल’च्या घोषात प्रारंभ करण्यात आला. राम मंदिर दक्षिण दरवाजासमोर असणाऱ्या विठ्ठल मंदिराजवळ काही वेळ दिंडी थांबली. या ठिकाणी सुषमा अंधारे यांना सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना विठ्ठल-रखुमाई, प्रभू श्रीरामाला; हनुमंताला करण्यात आली. निवृत्तीनाथ संस्थानचे संजयनाना धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली रामतीर्थावर सुषमा अंधारे यांना सुबुद्धी व्हावी आणि त्या ज्या कोणत्या राजकीय पक्षांमध्ये आहेत त्या पक्षाला वारकरी सदस्य मतदान करणार नाही, असा संकल्प केला. यावेळी मागणीचे निवेदन पंचवटी पोलिसांना देण्यात आले. पंचवटी पोलिसांनी रामकुंड परिसर आणि दिंडीच्या मार्गावर बंदोबस्त ठेवला होता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील