नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२०: काही दिवसांपूर्वीच चिनी हेरगिरीच्या माध्यमातून सुरू असलेली हेरगिरी समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा खुलासा समोर आला आहे. नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) चे अनेक संगणक हॅकर्सनी हॅक केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमनं सप्टेंबरच्या सुरूवातीलाच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
एनआयसीच्या या संगणकांमध्ये भारतीय सुरक्षा, नागरिक, मोठ्या व्हीआयपी व्यक्तिमत्त्वाशी संबंधित डेटा उपलब्ध आहे. यामध्ये पंतप्रधान ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या डेटाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला बेंगळुरू येथील एका फर्मकडून करण्यात आला होता. एनआयसीच्या कर्मचार्यांना एक मेल प्राप्त झाला, त्या मेल मधील लिंक वर क्लिक केलं असता त्यातील सर्व डेटा गायब झाला.
या सायबर हल्ल्यात सुमारे १०० संगणकांना लक्ष्य केल्याचं सांगण्यात येतंय. ज्यात काही एनआयसीचे होते तर काही आयटी मंत्रालयाशी संबंधित होते.
या प्रकरणानंतर एनआयसीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार हा मेल बेंगळुरूमधील एका अमेरिकन कंपनीकडून आला आहे. ज्याची माहिती आयपी ऍड्रेस वरून मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वीच एका अहवालात दावा करण्यात आला होता की, काही चिनी कंपन्या सुमारे दहा हजार भारतीयांवर लक्ष ठेवून आहेत. यामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती, वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, नेते, क्रीडापटू, कलाकार अशा अनेक नामांकित व्यक्तींच्या डेटावर नजर ठेवली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे