जळगाव ७ डिसेंबर २०२३ : राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमधून भाषा आणि प्रदेशाच्या सीमा गळून पडतात आणि खऱ्या अर्थाने देशाच्या संस्कृतीची ओळख होते. ज्याचा फायदा व्यक्तीमत्व विकासासाठी होतो, असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी केले. ते भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागीय संचालनालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य प्रादेशिक संचालक अजय शिंदे, संचालक डॉ. सचिन नांद्रे, युथ ऑफिसर सुमंतकुमार यादव उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक एम. राजुकुमार म्हणाले की, मी तामिळनाडूत शिकत असतांना राष्ट्रीय सेवा योजनेत काम केले आहे. ग्रामिण भागातील अनेक शिबिरांमध्ये भाग घेतल्यामुळे माझ्या व्यक्तिमत्व विकासाला फायदा झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तोंडी परीक्षेत मला रा.से.यो.बद्दल खूप प्रश्न विचारले गेले. मी स्वत: रा.से.यो. स्वयंसेवक म्हणून काम केले असल्यामुळे आत्मविश्वासाने उत्तरे देवू शकलो. या राष्ट्रीय एकात्मता शिबिरातून इतर प्रांतातील विद्यार्थ्यांच्या ओळखी झाल्यामुळे सोशल मिडियाच्या पलिकडे जाऊन प्रत्यक्ष मित्र मिळाले असतील. भविष्यात ही मैत्री कायम ठेवून विचारांचे आदान-प्रदान करा असे आवाहन केले. यावेळी शिबिरार्थींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे राजकुमार यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी शिबिरार्थींना जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन करतांना देशासाठी योगदान तरूण पिढीने द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या शिबिरातून इतर भाषा आणि संस्कृती यांचा आदर आणि विश्वास वाढीला लागून एकात्मततेची भावना वृध्दींगत होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. प्रादेशिक संचालक अजय शिंदे यांनी हे शिबिर यशस्वी झाल्याचे मत व्यक्त केले. डॉ. सचिन नांद्रे यांनी आढावा घेतला. यावेळी शिबिरार्थींच्या वतीने सुषमा वाघ, सना विल्सन, अक्षय आखाडे, धनश्री महाले व साहिल यांनी तर संघ प्रमुखांच्या वतीने प्रा.अमेय्या आणि प्रा. नरेंद्र गुप्ता यांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनेश पाटील यांनी केले. डॉ. विजय पाटील यांनी आभार मानले.
या शिबिरात घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत गोवा विद्यापीठाने प्रथम, केरळ विद्यापीठाने द्वितीय, गोवाहाटी विद्यापीठ आसामने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कर्नाटक विद्यापीठ चतुर्थ तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड हे या स्पर्धेत पाचव्या स्थानी राहीले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील