राष्ट्रीय जनजाती आयोगाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

धुळे, १७ एप्रिल २०२३: खोट्या कागदपत्रांचा वापर करून आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावावर केल्या प्रकरणी आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी राष्ट्रीय जनजाती आयोगाकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन आयोगाने धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नोटीस बजावली असून, १५ दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

शिरपूर तालुक्यातील मौजे शिंगावे येथे आदिवासी बांधवांना फसविण्याच्या उद्देशाने बनावट दस्तावेज तयार करून खोटे खरेदीखत, जमिनीचे व्यवहार झाले आहेत. राज्यातही इतरत्र हेच प्रकार सुरू असून, आदिवासी बांधवांच्या जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारांची सखोल चौकशी करावी तसेच आदिवासींच्या जमिनी बळकावणाऱ्या भूमाफियांविरोधात अॅट्रॅसिटी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी परिषदेने केली होती.

भारताच्या जनजाती आयोगाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना शिरपूर प्रकरणी वस्तूस्थिती पाठविण्याची सूचना केली आहे. मुदतीत उत्तर न मिळाल्यास दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करून दिल्लीत प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी समन्स जारी केले जाईल, असेही आयोगाचे संशोधन अधिकारी एच. आर. मिना यांनी नोटीसीमध्ये स्पष्ट केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा