हवामान विभागाचा देशभर अलर्ट, दिल्ली-यूपीसह उत्तर भारतात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट

मुंबई, २७ जुलै २०२३ : IMD म्हणजेच भारतीय हवामान विभाग ने देशातील विविध भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD नुसार, पुढील तीन दिवसांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नोएडा गाझियाबादमधील काही भागात हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

IMD नुसार बुधवार ते शनिवार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात शुक्रवार ते रविवार पाऊस पडू शकतो. त्याचवेळी बुधवार ते शुक्रवारपर्यंत राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय बुधवार ते शनिवार मध्य भारतात काही ठिकाणी हलका आणि मुसळधार पाऊस पडू शकतो. बुधवार आणि गुरुवारी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडू शकतो. तर बुधवार ते शुक्रवार छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पश्चिम भारतातील काही भागात हलका ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवार ते शनिवार कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात जास्त पावसाची शक्यता आहे. राजधानी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय बुधवार आणि गुरुवारी गुजरात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

दक्षिण भारतातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी रायलसीमा आणि अंतर्गत कर्नाटकात खूप मुसळधार पाऊस पडू शकतो, तर बुधवार आणि गुरुवारी तेलंगणा, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि पूदुच्चेरी मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बुधवारी कोस्टल कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा