महाराष्ट्रात नवे गडी नवे मंत्री, राष्ट्रवादीच्या तब्बल नऊ जणांचा शपथविधी

पुणे, २ जुलै २०२३ : राष्ट्रवादीच्या गोटामध्ये सकाळपासूनच नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अजितदादांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल हे ही उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. तर दुसरीकडे पुण्यामध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन प्रांतअध्यक्ष निवडीसाठी सहा जुलैला बैठक बोलावल्याचे सांगितले. या पाठोपाठच राष्ट्रवादीमध्ये भूकंप घडून आज अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. थोड्याच वेळात अजितदादा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

एक वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. त्या पाठोपाठ आता अजितदादांच्या रूपाने राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडल्याचे आज पाहायला मिळाले. राजभावनावरती झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी अजित दादा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. तर त्याचबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. एखादा अपवाद वगळता यातील सर्वजण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.

या शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई,आमदार भरत गोगावले आधी उपस्थित होते. तर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले,आमच्या डबल इंजिनच्या सरकारबरोबर आता अजितदादा आल्याने राज्याचा विकास बुलेट ट्रेन च्या वेगाने होणार आहे. तर यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले जे घडले ते महाराष्ट्राच्या हितासाठी घडले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आपल्या ४० समर्थक आमदारां समवेत सरकारला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा