मुंबई २१ जून, २०२१ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कुणाचे नाव द्यावे, हा प्रश्न अजूनही वादातच आहे. या विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी होत होती. तसेच सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावं असा प्रस्ताव दिला. मात्र भाजपने या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. मात्र आता या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देणं उचित ठरेल, असं राज ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बातचीत केली.
कुठलाही व्यक्ती जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा तो छत्रपती शिवरायांच्या नगरीत येतो. तसेच हे विमानतळ नवीन विमानतळ नाही. तर मुंबईच्याच विमानतळाचा वाढीव भाग आहे. हे विमानतळ जरी सिडकोच्या जागेत असलं तरी ते मुंबईच्या विमानतळाशी संलग्न आहे. केवळ जागा नसल्यामुळे ते नवी मुंबईत प्रस्थापित करण्यात येत आहे. त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव असेल, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. याच त्यांच्या भूमिकेला पाठींबा असल्याचं भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनीही माध्यमांना सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी;तृप्ती पारसनीस.