आर्थिक उड्डाणाची दिशा

नव्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि भूमिगत मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी झाले. मुंबई या नावातच ऊर्जा आहे. विजेच्या बाबतीत जशी ती साठवून ठेवता येत नाही, तसेच मुंबईच्या उत्साहाचेही आहे. मुंबईपासून कुणी काही हिरावून घेण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी मुंबई आणि मुंबईकर किरकीर न करता विकासाच्या मार्गावर धावत राहतात. “थांबला, तो संपला” असे मुंबईकरांच्या मनात पक्के असते. त्यामुळे तो कधीच थांबत नाही. ऊन, वारा, पाऊस, चक्रीवादळे, लाटा — त्याला कधीच थांबवू शकत नाहीत.

मुंबईची भौगोलिक रचना लक्षात घेता तिच्या वाढीला मर्यादा आहेत; परंतु म्हणून मुंबई काही वाढायची थांबली नाही. समांतर वाढता येत नाही, म्हणून ती उंचच उंच होत गेली. समुद्रात भराव टाकून आणखी काही बेटे विकासाच्या प्रवाहात सामील झाली. शरद पवार मुख्यमंत्री असताना मुंबईला नव्या मुंबईचा पर्याय मिळाला. मुंबईच्या जुन्या बंदराला ‘जेनपीटी’चा पर्याय उभा राहिला. नव्या मुंबईत आता पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात असली, तरी तिलाही आता मर्यादा आहेत. त्यामुळेच नव्या मुंबईनजीक तिसरी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई आकाराला येत आहे.

मुंबईत पूर्वी फक्त पश्चिम आणि मध्य अशा दोनच रेल्वे लाईन होत्या. त्यानंतर हार्बर आली. आता तर वसई आणखी एका मार्गाने पनवेलशी जोडली आहे. कर्जत-पनवेल जोडले गेले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे अनेक ठिकाणी परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत. मुंबईत मोनोरेल आहे; परंतु तिला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मेट्रोच्या १३ लाईन मंजूर आहेत, त्यापैकी दोन लाईन सुरू झाल्या आहेत, तर तिसऱ्या लाईनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.

मुंबई आता सात बेटापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती थेट पालघरपासून कुलाब्यापर्यंत आणि मलबार हिलपासून उरणपर्यंत वाढली आहे. कसारा आणि कर्जतपर्यंत तिचा विस्तार झाला आहे. त्यामुळे जेव्हा मुंबईच्या विकासाचा विचार येतो, तेव्हा बृहन्मुंबईपुरता विचार करून चालत नाही.

बेंगळुरू आणि पुण्यापेक्षा मोठी असूनही मुंबईला या दोन शहरांसारखा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नाही. त्याचे कारण म्हणजे सुरुवातीपासूनच मुंबई गतिमान ठेवण्यासाठी तिथे पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. अटल सेतू, सागरी मार्गासारखे अनेक प्रकल्प आले. मुंबईत दोन विमानतळे आहेत — सांताक्रूझ हे देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी वापरले जाते, तर सहार हे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी.

मुंबईचे जागतिक आणि आर्थिक स्थान लक्षात घेतले, तर सध्याचे विमानतळ अपुरे पडत होते. एका धावपट्टीच्या वापराचे अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले असले, तरी त्याला मर्यादा होत्या. अलिकडच्या काळात विमानाने प्रवास करणाऱ्यांची वाढलेली संख्या आणि मुंबईतील विमानतळाच्या पायाभूत सुविधा यांचे गणित जमत नव्हते. त्यामुळे नव्या मुंबई विमानतळाची उभारणी करण्यात आली.

जागतिक दर्जाची दोन विमानतळे भारतात सुरू झाली असून, एक दिल्लीनजीक आणि दुसरे नव्या मुंबईत आहे. मुंबईच्या सध्याच्या विमानतळावर विमाने उभी करण्यासाठी जागा नव्हती, त्यामुळे ती पार्किंगसाठी गोवा, नागपूर, अहमदाबाद या ठिकाणी पाठवावी लागत होती. आता नव्या मुंबई विमानतळामुळे हा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नसून, तो खऱ्या अर्थाने नव्या महाराष्ट्राच्या आर्थिक उदयाचा अनेक वर्षे लक्षात ठेवावा असा क्षण आहे. कोणत्याही देशाच्या शाश्वत आणि वेगवान आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास ही एक आवश्यक पूर्वअट आहे.

जागतिक स्तरावर अनेक देश पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन, देखरेख आणि व्यवस्थापन करण्यासाठी कार्यक्षम व सघन पद्धतींकडे वळत आहेत. महाराष्ट्रही त्यात मागे नाही. भारताची अर्थव्यवस्था काही वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरची होईल. त्यात महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलियन डॉलरचा असावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतून देशाच्या तिजोरीत सर्वाधिक कर जातो. त्यामुळे मुंबईत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जादा लक्ष आणि निधी दिला जात असेल, तर कुणाला पोटदुखी होण्याचे कारण नाही. पायाभूत सुविधा असतील, तरच गुंतवणूक वाढते. गुंतवणूक आली, उद्योग वाढले, लोक आले, तर चलन फिरते.

मुंबई महानगर प्रदेशासाठी दुहेरी विमानतळ प्रणालीचा भाग म्हणून नवी मुंबई विमानतळाची कल्पना करण्यात आली आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळास पूरक ठरेल. सुरुवातीला २० दशलक्ष प्रवासी प्रतिवर्ष क्षमतेचे हे विमानतळ अखेरीस ९० दशलक्ष प्रवासी क्षमतेचे होईल. त्यामुळे ते भारतातील सर्वात मोठे प्रवासी हाताळणारे विमानतळ बनेल.

मल्टिमॉडेल हब म्हणून डिझाइन केलेले नवी मुंबई विमानतळ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, बुलेट ट्रेन, नवी मुंबई आणि मुंबई मेट्रो, उपनगरीय रेल्वे नेटवर्क आणि नियोजित जलमार्गांशी अखंडपणे जोडले जाईल. हे एकत्रीकरण प्रवासाचा वेळ कमी करेल, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि पश्चिम भारतातील विस्तृत भागातून मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मजबूत करेल.

भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळासारख्या आकाराच्या या वास्तूत सांस्कृतिक वारसा, जागतिक दर्जाचे डिझाइन आणि टिकाऊपणाची वैशिष्ट्ये यांचा मिलाफ आहे. त्यामुळे हे विमानतळ भारतीय ओळख आणि भविष्यातील आकांक्षांशी जुळणारे ठरणार आहे.

एका रनवे आणि टर्मिनलसह कार्यरत असलेल्या या विमानतळाचा विस्तार चार रनवे आणि एकाधिक टर्मिनलपर्यंत केला जाईल. त्यात नाशवंत वस्तू आणि एक्सप्रेस कार्गोसाठी समर्पित कार्गो टर्मिनल आणि अत्याधुनिक सुविधा असतील. त्यामुळे भारताच्या व्यापार आणि लॉजिस्टिक्स परिसंस्थेला मोठा हातभार लागेल.

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन आर्थिक वाढ, जागतिक स्पर्धात्मकता आणि नागरिकांच्या आकांक्षांना पाठिंबा देणारे, भविष्यसज्ज आणि जागतिक दर्जाचे पायाभूत बांधकाम निर्माण करण्याच्या भारताच्या निर्धारावर जोर देते. देश ‘विकसित भारत २०४७’ च्या दिशेने वाटचाल करत असताना, नवी मुंबई विमानतळ आधुनिक अभियांत्रिकी, सहयोगी विकास आणि जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात भारताच्या वाढत्या स्थानाचे प्रतीक म्हणून उभे आहे.

या विमानतळामुळे केवळ नवी मुंबई किंवा मुंबईच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल. मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतून या विमानतळाशी जलद कनेक्टिव्हिटी होईल.

पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फळबागा, फुलशेती आणि मत्स्य शेती विकसित झाली आहे. मुंबई–पुणे–नाशिक त्रिकोणात मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम उत्पादने घेतली जातात. नवी मुंबई विमानतळामुळे या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत जलद गतीने पोचता येईल. तसेच जगातून या भागात आवश्यक आयातही वेगाने होऊ शकेल.

या विमानतळासाठी जगातील सर्वात अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात आल्या असून, भविष्याचा वेध घेत एआय चाही वापर करण्यात आला आहे. एआय-आधारित रांगेचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आणि ‘डिजी यात्रा’ सारख्या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना पेपरलेस, कॉन्टॅक्टलेस आणि अत्यंत जलद प्रवासाचा अनुभव मिळेल.

शाश्वत ऊर्जेचा पुरस्कार आणि अंगीकार हे अदानी समूहाचे धोरण राहिले असून, त्याची छाप या विमानतळातही पाहायला मिळते. या विमानतळामध्ये अंतिम टप्प्यात ४७ मेगावॉट सौर ऊर्जेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याशिवाय ‘ईव्ही’चा वापर, ‘ईव्ही’ चार्जिंग सुविधा, सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल’ (SAF) स्टोरेज सुविधा — या सर्व गोष्टी प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.

नवी मुंबई विमानतळ हे केवळ हवाई वाहतूक क्षेत्रात क्रांती करणार नाही, तर ते नोकरीच्या अनेक संधी निर्माण करणारे ठरणार आहे. या विमानतळामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अंदाजे तीन लाखांहून अधिक नोकऱ्या आणि उद्योग संधी निर्माण होतील. त्यामुळे या विमानतळामुळे विकासाचेही उड्डाण होईल.

भागा वरखडे