नवी दिल्ली, ७ डिसेंबर २०२२ :चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाची विनाअट माफी मागितली. विवेक अग्निहोत्री यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना जामीन देण्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती आणि विद्यमान ओरिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते.
याबाबत निर्णय घेताना दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले, न्यायालयाचा अवमान करणारा व्यक्ती स्वतः विवेक अग्निहोत्री आहे. त्यामुळे त्याने पुढील सुनावणीत प्रत्यक्ष हजर राहावे. स्वतः हजर राहून पश्चाताप व्यक्त करण्यात त्याला काही अडचण आहे का? माफी कायम प्रतिज्ञापत्र दाखल करूनच मागितली पाहिजे असे नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
नेमके प्रकरण काय?
भीमा कोरेगाव प्रकरणात तत्कालीन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी आरोपी आणि मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर विवेक अग्निहोत्रीने ट्वीट करत न्यायमूर्ती मुरलीधर यांच्यावर पूर्वग्रह आणि पक्षपातीपणाचा आरोप केला होता.
दरम्यान, न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती तलवंत सिंग यांच्या खंडपीठाने प्रतिज्ञापत्रावर विचार करून या प्रकरणाची सुनावणी १६ मार्चपर्यंत स्थगीत केली. न्यायालयाने सांगितले की, हे प्रकरण न्यायालयाने स्वत:हून घेतले असल्याने, विवेक अग्निहोत्री यांना पुढील तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.