अमरावती, २१ ऑक्टोंबर २०२२ : बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं या वॉरंटवर मुलुंड पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे. खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली. पण सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आता शिवडी कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नवनीत राणा प्रकरण काय ?
नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप लावण्यात आला. तसेच नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं ८ जून २०२१ रोजी रद्द केलं. शिवाय त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळं नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात २०१७ मध्ये दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे.
त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर हायकोर्टाने निर्णय देत जातप्रमाणपत्र रद्द केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि २२ जून २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत कौर राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
तर आत्ता शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं या वॉरंटवर मुलुंड पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. ७ नोव्हेंबर ला बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाची पुढील कारवाई होणार आहे. तोपर्यंत नवनीत राणा यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आता मुलुंड पोलीस नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंटवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं जाणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे