पिंगोरी येथे श्री वाघेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा; कोरोनामुळे अनेक कार्यक्रम केले रद्द

पुरंदर, २५ ऑक्टोबर २०२०: शिंदे सरदारांची कुलस्वामीनी असलेल्या पिंगोरी येथील श्री. वाघेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव उत्साहात परंतु सध्या पद्धतीने पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने संपंन्न झाला. उत्सवानिमित्त सर्व कार्यक्रमाला बगल दिल्याची माहिती पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी दिली.

छत्रपती शिवाजीराजे याच्या बरोबर स्वराज्य स्थापनेत पिंगोरी गावातील शिंदे सरदारांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला होता. यानंतर उत्तरेत स्वराज्य वाढवण्यासाठीही शिंदे सरदारांनी मोठी कमागीरी केली होती. या शिंदे सरदारांची कुलस्वामिनी असलेल्या पिंगोरीच्या वाघेश्वरी मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस या मंदिरात भरगच्च कार्यक्रम असतात. छबीना, आरती, देवीचा गोंधळ असे कार्यक्रम रोज होत असतात. यावेळी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक गावकरी आवर्जून घरी येऊन दहा दिवस या उत्साहात सहभागी होतात.

पिंगोरी गाव हे सरदार, सैनिकांचे गाव म्हणुन ओळखले जाते. आजही या गावातील अनेक तरुण भारतीय सैन्यामध्ये सेवा बजावत आहेत. याच गावातील दोन सैनिकांना पाकिस्तान विरोधात व श्रीलंकेतील शांती सेनेतून लढताना वीर मरण आले होते. अशा या गावात या देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र यावेळी कोरोना असल्याने देवस्थान कमिटीने सर्व कार्यक्रम रद्द केले होते. शासनानेही लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पिंगोरी येथील चाकरमान्यांनी या
वर्षी नवरात्र उत्साहात गावाकडे न येणेच पसंद केले.

याबाबत बोलताना देवस्थान कमिटीचे पोपट शिंदे म्हणाले की, यावर्षी उत्सवात लोक सहभाग नसल्याने या उत्सवाला शोभा आली नाही. पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे म्हणाले की, शासनाने कोरोना असल्याकारणाने या रोगाचा सामूहिक प्रसार होऊ नये म्हणुन कडक उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे नवरात्रातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. तर नित्य पूजा व मानकऱ्यांच्या उपस्थित नैमित्तिक कार्यक्रम पार पडले.

न्युज अनकट प्रतीनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा