पुरंदर, दि.२४,मे २०२०: नवदांपत्य किंवा महिन्याची वारी या निमित्ताने जेजुरीचे खंडोबा मंदिर बंद असताना सुध्दा जेजुरीगडाच्या पहिल्या पायरीच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत. जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी लपुन छपून येणाऱ्या भाविकांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे जेजुरी पोलिसांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने ताब्यात घेऊन कारवाई करण्याची सुचना जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिल्या आहेत. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना देव दर्शन महागात पडणार आहे.
सध्या शासनाने लोकांना सामाजिक अंतर राखत व कमी लोकात विवाह करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे विवाह समारंभाचा हंगाम सुरू झाला आहे. विवाहानंतर नवविवाहित जोडपे दर्शनासाठी कुलदैवत श्री.खंडोरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत येत आहेत. पण सध्या कोरोना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणासाठी लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. दर्शन बंद असले तरी नवविवाहित जोडपे पायरी दर्शनासाठी येत असल्याने पुरंदर तालुक्यातील प्रशासनाने सक्त सुचना देत जेजुरीला दर्शनासाठी न येण्याचे आवाहन केले आहे. जर कोणी दर्शनासाठी आले तर त्यांचे वाहन जप्त करण्या येईल, असे पोलिसांकडुन सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर पर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करुन वैवाहिक जीवनाला प्रारंभ करतात. नवविवाहित दांपत्य जीवनाचा प्रवास सुरू करण्याआधी जोडीने पाच पायऱ्या चढून गड चढण्याची परंपरा आहे.
मात्र सध्या मंदिर बंद असल्याने काही जोडपी पहिल्या पायरीचे दर्शन घेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मंदिराचा पायरी मार्ग बंद असूनही भाविक तसेच नवदांपत्य प्रवास करुन येत आहेत. या भाविकांमध्ये अगदी रेड झोनमधील लोकही येऊ लागल्याने जेजुरी शहरातील नागरिकांनी भिंती व्यक्त केली आहे. यामुळे जेजुरीच्या पोलीसांनी कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
यापुढे दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांना जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये जमा केले जाईल व सदर इसमा विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.असा इशारा जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे