नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवलं, संसदीय व्यवस्थेला टाळं लावलं जावं : संजय राऊत

मुंबई, 17 जून 2022: नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी मतदान करण्यास परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत आज सुनावणीदरम्यान न्यायालयाने मतदान करण्यास नकार दिलाय. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हंटलं की, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवलं आहे. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून धमक्या कोण देत आहे हे सर्वांना ठाऊक आहे.

काय म्हणाले राऊत

संजय राऊत म्हणाले की, “लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या आमदाराला तो अधिकार आहे की, एखाद्या राज्यसभा किंवा विधान सभा निवडणुकीत त्यानं मतदान करावं. ते काय गुन्हेगार आहे का? त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल झालाय का? त्यांच्यावर कोणता आरोप सिद्ध झालाय का? त्यांना कोणती शिक्षा ठोठावलीय का? त्यांना बेकायदेशीर पणे डांबून ठेवलंय असं माझं मत आहे.”

पुढं ते म्हणाले की, “विधान परिषदेचे निवडून येणारे सदस्य विधान सभेचं प्रतिनिधित्व करतात. अश्यावेळी त्या विधानसभेचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांना मतदानाचा अधिकार नाकारला जात असेल तर अश्या अवस्थेत देशातील संसदीय व्यवस्थेला टाळं लावलं जावं असं माझं मत आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा