छत्तीसगड जंगलातील नक्षल्यांच शिबीर उध्वस्त, स्फोटकांसह साहित्य जप्त

गडचिरोली, १७ ऑगस्ट २०२३ : छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील भोपालपट्टनम पोलीस ठाण्यातंर्गत, दम्मूर-बारेगुडाच्या जंगलात पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षलवादी दबा धरून बसले होते. नक्षल्यांचे शिबीर उध्वस्त करण्यात छत्तीसगड आणि गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून स्फोटके आणि अन्य नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, दम्मूर-बारेगुडाच्या जंगलात छत्तीसगडमधील नॅशनल पार्क एरिया कमिटीचे २० ते २५ नक्षलवादी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर भोपालपट्टनम पोलीसांचे डीआरजी दल आणि गडचिरोली जिल्ह्यातील पातागुडम पोलीस ठाण्यातील सी-६० पथकाचे जवान संयुक्तरीत्या जंगलात पाठविण्यात आले.

नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे स्फोटके, डिटोनेटर, जिलेटीन, नक्षल्यांचे जीवनावश्यक वापराचे साहित्य आणि पुस्तके आढळून आली. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले. अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा