नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; १७ जवान शहीद, १४ जखमी

रायपूर: छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केलाय. यामध्ये १७ जवान शहीद झाले असून १४ जखमी झाले आहेत. डीआरजीच्या जवानांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. देश कोरोनाच्या महामारीशी सामना करत असताना नक्षलवाद्यांनी आपला डाव साधत छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला केला. शनिवारी दुपारी सुकमामधील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरुन परतत होते. या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. यातील १२ जवान डीआरजीचे तर ५ जवान हे एसटीएफचे असल्याची माहिती आहे.

स्थानिक तरुणांचा भरणा असलेल्या डीआरजीनं नक्षलवाद्यांच्या विरोधात सर्वात प्रभावी कारवाया केल्या आहेत. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी दीडच्या सुमारास चकमकीला सुरुवात झाली. कोराजगुडाच्या चिंतागुफामध्ये सशस्त्र दल आणि पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात सशस्त्र कारवाई सुरू केली. डीआरजी, विशेष कृती दल आणि कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिज्योलुशन ऍक्शन) यांनी संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली.

सुत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकांच्या टीमला नक्षलवाद्यांचा म्होरक्या हिडमा याच्या कॅम्पची माहिती मिळाली होती. यानंतर त्याच्या शोधासाठी हे जवान निघाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिसांनी ४ ते ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं असल्याची देखील माहिती आहे. हे नक्षलवादी बुलेट प्रुफ जॅकेट घालून आले होते. हिडमा देखील या चकमकीत जखमी झाला असल्याची माहिती आहे

या कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांकडील शस्त्रसाठा पळवला. यामध्ये एके-४७, इंसास, एलएमजीचा समावेश आहे. कालपासून काही जवान बेपत्ता झाले. त्यांच्या शोधासाठी १५० सुरक्षा अधिकारी रवाना झाले होते. अखेर आज १७ जवानांचे मृतदेह हाती लागले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा