‘एनसीबी’ने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा केला पर्दाफाश; दोन अफगाण नागरिकांसह १६ जणांना अटक

दिल्ली, ९ जानेवारी २०२३ : ‘एनसीबी’ला (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) मोठे यश मिळाले आहे. येथे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटच्या तारा दिल्लीच्या शाहीनबाग आणि मुझफ्फरनगरला जोडलेल्या आढळल्या आहेत. मुझफ्फरनगरमध्ये दोन अफगाण नागरिकांकडून हेरॉईनची प्रक्रिया केली जात होती. परदेशातून आलेल्या हेरॉईनला शाहीनबाग येथून मुझफ्फरनगरला पाठवले जात होते. या सिंडिकेटकडून आतापर्यंत १५० कोटींहून अधिक किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. खरं तर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी लुधियानामध्ये ‘एनसीबी’च्या चंदीगड युनिटने संदीप सिंगकडून २० किलोंपेक्षा जास्त हेरॉइन जप्त केले.

अशा प्रकारे ‘एनसीबी’ने अनेक एजन्सींसह आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. या हेरॉईनवर २ लॅबमध्ये प्रक्रिया केली जात होती. हे सिंडिकेट चालवणाऱ्या दोन अफगाण नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. हे सिंडिकेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून चालत होते आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरले होते. या सिंडिकेटची ६० बँक खाती जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, सातत्याने टाकलेल्या छाप्यांमध्ये ३० किलोंहून अधिक हेरॉईन आणि इतर अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी संदीप सिंगसह १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात २ अफगाण नागरिकांचाही समावेश आहे. या टोळीचा सूत्रधार अक्षय छाबरा आहे. जो लुधियानामधून हे सिंडिकेट चालवत होता, अक्षयचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संबंध आहेत. तो कार्गोद्वारे हेरॉईन मागवतो. या सिंडिकेटने खरेदी केलेल्या एकूण ३० मालमत्तांची ओळख पटली असून, ती जप्त करण्यात येत आहेत.

तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर सर्व आरोपी पकडले
या सिंडिकेटचे जाळे क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये पसरले होते. या सिंडिकेटचा दारू, तूप, तांदळाचा व्यवसायही होता. ‘एनसीबी’च्या उत्तर विभागाचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या मते, ही एक मोठी कारवाई होती. ज्यामध्ये ३ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर सर्व आरोपी पकडण्यात आले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा