NCP Leader Husband Accused in Private Money Lending Case: राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा समोर आला आहे. शरदचंद्र पवार गटाच्या महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे यांचे पती सचिन पोकळे यांच्यासह पाच जणांवर खासगी सावकारी आणि दमदाटी केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात फिर्याद देणारे विक्रम चाकणकर हे अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निकटवर्तीय असल्याने, या प्रकरणाला आता राजकीय संघर्षाची किनार लाभली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही कायदेशीर परवाना नसताना सचिन पोकळे आणि त्यांच्या साथीदारांनी १० ते २० टक्के अशा अवाढव्य व्याजाने लोकांना पैसे दिले. फिर्यादी चाकणकर यांच्या दाव्यानुसार, आरोपींनी रोख आणि चेकद्वारे आतापर्यंत तब्बल ४ ते ५ कोटी रुपये व्याज उकळले आहेत. याशिवाय, अजून २ कोटी रुपयांची मागणी करत शिवीगाळ, दमदाटी आणि घर स्टॅम्पपेपरवर लिहून देण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
खडकवासला परिसरात दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच वर्चस्वाची लढाई सुरू आहे. या नव्या प्रकरणामुळे ही राजकीय खडाजंगी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून, हा राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील वैचारिक आणि गटबाजीच्या संघर्षाचे प्रतिबिंब असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
या गंभीर आरोपांमुळे पुणे शहरातील राजकारण ढवळून निघाले असून, दोन्ही गटांचे कार्यकर्ते आणि नेते यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपासात या प्रकरणाचे आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे











































