पुणे विमानतळावर राष्ट्रवादी नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर व काडतुसे सापडले

पुणे विमानतळावर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि काडतुसे सापडले. पंढरपूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत प्रभाकर बागल (वय ६३) आपल्या सामानात रिव्हॉल्वर आणि काडतुसे घेऊन प्रवास करत होते. सुरक्षा तपासणी दरम्यान हे शस्त्र पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आढळल्यामुळे सीआयएसएफ आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि विमाननगर पोलिसांकडे सोपवले.

चौकशीत समोर आले की, बागल यांच्याकडे शस्त्राचा वैध परवाना असून तो फक्त महाराष्ट्रासाठीच वैध आहे. वाराणसीकडे प्रवास करताना त्यांनी आवश्यक परवानगी न घेतल्यामुळे हा उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासानंतर त्यांचे शस्त्र जप्त करण्यात आले आणि त्यांना चौकशीसाठी नोटीस देऊन पुढील प्रवासास परवानगी देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना प्राथमिक पातळीवर शस्त्र परवाना नियमावलीचे उल्लंघन आहे. वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांनी सांगितले की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चंद्रकांत बागल हे व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून २०१४ मध्ये पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून दूर राहिले आहेत, तसेच यापूर्वी ते सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिलेले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील