नवरात्रौत्सवासाठी शहरभर घटस्थापना, मंदिरे दिव्यांनी उजळली, दापोडीच्या फिरंगाई देवी मंदिरात विशेष कार्यक्रम

पिंपरी-चिंचवडमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू. सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीसाठी शहरातील सर्व देवी मंदिरे दिव्यांनी, फुलांनी आणि रंगरंगोटीने सजली आहेत. रविवारी शहरातील बाजारपेठांमध्ये पूजा साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली, ज्यात सप्तधान्य, कलश, कुंकू-हळद, फुले आणि मूर्तींची विक्री मोठ्या प्रमाणात झाली.

शहरातील दुर्गादेवी टेकडी, वैष्णोदेवी, तुळजाभवानी, फिरंगाई देवी यांसारख्या प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांचे स्वागत करण्यासाठी तयारी पूर्ण आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत पूजा, अभिषेक, भजन, श्रीसूक्त पठण, देवीचा जागर, दांडियाचे कार्यक्रम अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

दापोडीतील श्री फिरंगाई देवी मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या मंदिराची स्थापना २५० वर्षांपूर्वी झाली होती. नवरात्रोत्सवात देवीला नऊ दिवस विविध अलंकार आणि फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. दुसऱ्या दिवशी तिळाच्या फुलांची माळ आणि सातव्या दिवशी कडाकण्यांचे तोरण बांधले जाते.

या नऊ दिवसांच्या काळात हजारो भाविक मंदिरात गर्दी करून देवीच्या विविध रूपांचे दर्शन घेतात. मंदिराचे पुजारी सुरेंद्र काटे या धार्मिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन करतील. एकूणच, नवरात्रोत्सव शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाने भरलेला असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे