माळशेज घाटात दरड कोसळली, पाहायला मिळाले माळशेज घाटाचे रौद्ररुप,घाट वाहतुकीसाठी बंद

मुंबई, २१ जुलै २०२३ : पावसाळा सुरु झाला की, सर्वसामान्यांना वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. जुलै महिन्यापासून निर्सगप्रेमी पर्यटकांची पावले आपोआपच घाट,डोंगर माथ्याच्या दिशेने वळू लागतात. पावसाळ्यात निर्सगाच सौंदर्य अधिक बहरून येते. चहूबाजूला, अगदी नजर जाईल तिथपर्यंत हिरवाईने निसर्ग नटलेला असतो. अशावेळी तरुणाईची पावले डोंगररांगा, धबधब्यांकडे नाही वळली तरच नवल. मुंबईकर-पुणेकर पावसाळ्यात माळशेज घाटात, कर्जत, खोपोलीला मोठ्या संख्येने येतात. येथील डोंगर रागांमध्ये अनेक धबधबे प्रवाहित होतात. पाऊस, गारवा, हिरवाई आणि पांढर शुभ्र धबधब्याचे फेसाळ पाणी मन मोहरुन टाकते.

तुम्ही जर माळशेजला जात असाल तर सावधान, याठिकाणचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. माळशेज घाटात दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे. यावेळी माळशेज घाटाच रौद्ररुप पाहायला मिळाले. हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळी पिकनिकसाठी माळशेज घाटात जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे. माळशेज घाट निर्सग संपन्न आहे. पण पावसाळ्यात तिथे धोकेही कमी नाही.

पावसाळ्यात पिकनिक प्रेमींमध्ये काही खास ठिकाणे आवडीची आहेत. माळशेज घाट त्यापैकीच एक. कल्याण-अहमदनगर मार्गावरुन प्रवास करताना माळशेज घाट लागतो. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतून येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. संपूर्ण माळशेज घाटात पावासळ्यात अनेक धबधबे प्रवाहित होतात. त्याशिवाय घाटात दाट धुके असते. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआपच माळशेज घाटाकडे वळतात. मुंबई, कल्याण, डोंबिवलीहून येणारे पर्यटक घाटात गाडी थांबवून धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेतात. माळशेज घाटाच सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असले, तरी या ठिकाणी दरडी कोसळण्याचा मोठा धोका आहे. यापूर्वी येथे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अलीकडे प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा