मुंबई, ८ मार्च २०२३ : ‘राष्ट्रवादी’चे आमदार प्रकाश सोळंके हे अडचणीत सापडले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्या संस्थांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजप नेते अशोक शेजूळ यांच्यावर तीन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी त्यांच्यासह पत्नी व इतरांवर पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक शेजूळ यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके आणि उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते अशोकराव शेजूळ यांच्यावर माजलगाव शहरातील शाहूनगर येथे ते दुचाकीवरून जात असताना मोटरसायकलवरून पाठीमागून आलेल्या पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर रॉडच्या व धारधार शस्त्राच्या साह्याने हल्ला चढविला. यामध्ये त्यांच्या हातापायावर जबर मार लागला असून एक पाय मोडला आहे. त्यांच्या डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हल्ला आमदार प्रकाश सोळंके यांनीच घडवून आणल्याचा आरोप अशोक शेजूळ यांनी केला. याप्रकरणी त्यांनी तक्रारही दाखल केली.
दरम्यान, सोळंके यांच्यासह पत्नी व इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्याप्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह पत्नी मंगला सोळंके, व्यापारी रामेश्वर टवाणी व इतर चार ते पाच जणांवर माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील