पुरंदर, १२ फेब्रुवरी २०२१: भाजपचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी आज पहाटे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या बाबत केलेले विधान याचा पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांच्याकडून जोरदार निषेध करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील तरुण फळी आता पुढे येताना दिसते आहे.
आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, युवक उपाध्यक्ष अक्षय निगडे यांच्या नेतृत्वाखाली नीरा येथील चौकात सर्व पक्षांनी एकत्र येत गोपीचंद पडळकर यांचा निषेध केला. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांने केली आहे. तर आज दुपारी जेजुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेजुरी येथे सुध्दा आ. पडळकर यांचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे माझी अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, जेजुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते जयदीप बाई यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी सुद्धा एक व्हिडिओ पाठवून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कृत्याचा निषेध नोंदवला आहे. आज त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप पाठवून दिली. त्यात त्यांनी पढळकरांच्या या कृत्याचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत तालुक्यातील सर्व भागातून पडळकर यांनी केलेल्या कृत्याचा, तसेच शरद पवार यांच्या बाबत बोललेला अपशब्दांचा लोकांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे