रत्नागिरी तालुक्यामध्ये कॉपीमुक्त दहावी बोर्डाची परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांचे शिक्षण विभागाला निवेदन

रत्नागिरी, २१ फेब्रुवारी २०२४ : तालुक्यामध्ये कॉपीमुक्त दहावी बोर्डाची परीक्षा व्हावी यासाठी कठोर उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला निवेदन सादर केले आहे.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की, रत्नागिरीतील मुलांच्या भवितव्याचा विचार करता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षासंदर्भात कॉपी प्रकरणात आपणाकडून कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. जेणेकरून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कॉपी होणार नाही. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा १ मार्च पासून सुरु होत असून रत्नागिरीमधील काही शाळांमध्ये कॉपी करण्यास शाळेमधुन विद्यार्थ्यांना सहकार्य मिळत असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे. दहावी बोर्डाची कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी आपणाकडून संबंधित परिक्षा केंद्राच्या परीक्षा हॉलमध्ये सी. सी. टीव्ही कॅमेरा लावण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच शाळांना भेट देण्यासाठी भरारी पथके नेमण्यात यावीत. जेणेकरून कॉपी करण्याची आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक आता शाळांना करता येणार नसल्याचे सर्वच केंद्रांना बोर्डाने आदेश दिले असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर या वर्षीपासून परीक्षा हॉलवरील पर्यवेक्षकच स्वत:कडे पाण्याची बाटली ठेवून विद्यार्थ्यांना पाणी देतील, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. परीक्षा हॉलमध्ये जाताना प्रत्येक विद्यार्थ्यांची अंगझडती घेतली जाईल असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना पायातील चप्पल, शूज बाहेर काढूनच आत प्रवेश द्यावा अशाही बोर्डाच्या सूचना असल्याचे समजते. बोर्डाच्या परीक्षेसाठी बोर्डाने जे वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत त्याचे काटेकोर पालन आपणाकडून होणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेच्यावेळी स्वतः बरोबर नेलेली पुस्तके, दप्तर आदी वस्तू परीक्षा हॉलमध्ये न ठेवता दुसऱ्या हॉलमध्ये ठेवण्यात येणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून ती त्यांना कॉपीसाठी उपलब्ध होणार नाहीत. दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी चांगला आभ्यास करून भयमुक्त वातावरणात कॉपीमुक्त परीक्षा द्यावी हिच आमची इच्छा असून वरील बोर्डाचे निर्देश आणि आमच्या मागणीचा आपणाकडून गांभीर्याने विचार व्हावा. जेणेकरून रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांचे पुढिल भविष्य उज्वल होईल. तरी वरील गंभीर बाबींचा विचार करून दहावी बोर्डाची कॉपीमुक्त परीक्षा होण्यासंदर्भात बोर्डाच्या आदेशाचा आणि आमच्या मागणीचा प्रामुख्याने विचार करून रत्नागिरी तालुक्यातील संबंधित परीक्षा केंद्रांना आणि शाळेना आपणाकडून वरीलप्रमाणे आदेश व्हावेत ही नम्र विनंती. अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा