कोल्हापुरातील सभेबाबत राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया

पुणे, २३ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन ते तेथील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत जाहीर सभाही घेत आहेत. येवला, बीड येथील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर शरद पवार आता २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावरून जनतेला संबोधित करणार आहेत. त्यांच्या या सभेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार रोहित पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेविषयी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यावर आधीपासूनच पुरोगामी विचारांचा पगडा आहे. शरद पवार असो किंवा रोहित पवार आम्ही सर्व येथे फक्त कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत. इथल्या कार्यकर्त्यांचीच ताकद जास्त असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. शरद पवार यांच्यासोबत जे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेत त्यांची आज ताकद आहे. ज्यांना सत्तेत राहायचे होते तेच सत्तेत गेले, पण खरे कार्यकर्ते पवारांसोबत राहिले. कोल्हापूरच्या दसरा चौक मैदानात जागा अपुरी पडेल एवढीच भिती आहे, असंही ते म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिला आहे. दसरा चौकातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला पुरोगामी संदेश द्यायचा असेल त्यामुळे दसरा चौकाची निवड पवार साहेबांनी केली असेल. येथील ताकद आहे ती कार्यकर्त्यांची आहे, आम्ही केवळ साहेबांचा संदेश घेऊन आलो आहोत. आमदार किती आहेत त्याच्यापेक्षा कार्यकर्ते किती आहेत हे महत्वाचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, साहेबांना एका पत्रकारांनी विचारलं होतं की आपल्यासोबत किती आमदार आहेत. त्यावेळी साहेबांनी शून्य असं उत्तर दिलं होतं. आमदारांपेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांची ताकद घेऊन विचार जपण्याची गरज असल्याचं साहेबांनी म्हटलं होतं. अशी माहिती रोहित पवारांनी यावेळी दिली.

“जेव्हा आपण एखाद्या जिल्ह्यासाठी नेत्यावर अवलंबून राहतो तेव्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नेतेच करत असतात. या प्रक्रियेत खरे कार्यकर्ते, पदाधिकारी जे लोकांमध्ये असतात, ताकदीचे असतात ते मागे राहतात. पण काहीजण साहेबांवर प्रेम करत असल्याने ते पक्षातच राहतात. माझ्याबरोबर जे पदाधिकारी आहेत ते विचारांनी भक्कमपणे माझ्यासोबत राहिलेले आहेत. पण कुठेतरी यांच्यावरही अन्याय होतोय असं वाटत होतं. पवारांनी भूमिका घेतल्याने दुसऱ्या फळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची ताकद असल्याने काही अडचण येईल असं वाटत नाही. काही जिल्ह्यात कार्यकर्ते मोकळा श्वास घेत असल्याची परिस्थिती आहे असंही रोहित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी ज्या दिवशी शपथ घेतली, त्याच दिवशी शरद पवार दौऱ्यावर निघाले होते. मात्र, लगेचच त्यांनी मवाळ भूमिका घेत, यावर जास्त बोलणे टाळले. त्या नंतर शरद पवारांचे दौरे सुरू झाले असले तरी त्यातही फारसा जोर दिसून येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेवर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता कोल्हापुरातील सभेत पवार काय आणि कोणाविषयी बोलणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आणि राजकीय विरोधकांना आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा