बिहार मध्ये १२५ जागांसह एनडीए पुन्हा सत्तेत…

पाटणा, ११ नोव्हेंबर २०२०: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. बिहारच्या सत्तेपासून १५ वर्षाचा वनवास संपण्याच्या उद्देशानं निवडणूक लढण्यास उतरलेल्या राष्ट्रीय जनता दलाची (आरजेडी) प्रतीक्षा अजून पाच वर्षे वाढली आहे. जनतेनं पुन्हा एकदा बिहारच्या सत्तेचा मुकुट नितीशकुमारांच्या डोक्यावर ठेवला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांनी २४३ पैकी १२५ जागा जिंकल्या आहेत.

बहुमतासाठी आवश्‍यक असलेल्या १२२ महत्त्वपूर्ण आकड्यापेक्षा तीन अकडे जास्त मिळवत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षनं ११० जागा जिंकल्या आहेत. एनडीए’तील घटकपक्षांपैकी नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडनं (जेडीयू) ४३ जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर, जेडीयूचे मित्रपक्ष असलेल्या भाजपचे ७४ जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. एनडीए’चे अन्य घटक हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) यांना चार जागा मिळाल्या आहेत आणि विकास इंसान पार्टीने (व्हीआयपी) चार जागा जिंकल्या आहेत.

सत्ता मिळाली पण कमजोर…

एनडीए’नं बहुमत मिळवून एक्झिट पोलच्या अंदाजांचा भंग केला आहे. एनडीए’ला बहुमत मिळाल्यानंतर नितीशकुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असा निर्णय आहे. नितीशकुमार यांना सत्ता मिळाली, पण त्यांची बिहारमधील पकड कमी झाल्याचं दिसत आहे. कारण, यंदा त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत.

यंदा प्रथमच जेडीयू युतीमध्ये भाजपच्या तुलनेत मागं आहे आणि ते दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनले आहे. मात्र, जागा कमी झाल्या तरी नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट केलं आहे.

राजद सर्वात मोठी पार्टी

मतमोजणीच्या सुरूवातीला एनडीए’च्या जवळपास दुप्पट जागांवर आघाडी घेत असलेल्या महागठबंधन आपली आघाडी कायम राखू शकली नाही. अखेरीस महागठबंधन केवळ ११० जागा जिंकू शकले. महाआघाडीचं नेतृत्व करणार्‍या आरजेडी’ ने ७५ जागा जिंकल्या. आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. महागठबंधन मधील काँग्रेसचे उमेदवार १९ जागा जिंकू शकले तर कम्युनिस्ट पक्षांनी १६ जागा जिंकल्या.

ओवेसी यांच्या पक्षाकडे पाच जागा

क बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांचा अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे उमेदवार पाच जागा जिंकण्यात यशस्वी झाले. एनडीएकडून निवडणूक लढणाऱ्या आणि निवडणूक जिंकणार्‍या लोक जनशक्ती पक्षानं (एलजेपी) केवळ एक जागा जिंकली. बहुजन समाज पक्षालाही एका जागेवर विजयश्री मिळाली तर एक जागा अपक्षांच्या खात्यात गेली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा