दौंड, १९ ऑक्टोबर २०२०: दौंड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली या भागातील पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. मळद येथे दोन वर्षांपूर्वी बांधलेला भराव तलाव पाण्याच्या दबावाने वाहून गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांना व राहिवाश्यांना आठवडा उलटून गेल्यावर काहीच मदत मिळाली नसल्याने यादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारींचा पाढा वाचुन प्रशासकीय यंत्रणेचे वाभाडे काढले आहे.
मळद (ता.दौंड) येथे जलयुक्त शिवार योजनेतुन ६७ लाख ८७ हजार इतका निधी वापरून साठवणुक तलाव बांधण्यात आला होता. या तलावाचे जलपूजन डिसेंबर २०१७ मध्ये तत्कालीन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र या तलावाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप अगदीच सुरुवातीपासूनच करण्यात येत असताना व पहिल्याच पावसात याचे डागडुजी करण्यात आली असताना देखील प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, दौंडचे आमदार राहुल कुल, भाजपाचे जेष्ठ नेते वासुदेव काळे इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान हा तलाव बुधवार (दि.१४) च्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फुटल्याने जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर अंतर असणाऱ्या गावांमध्ये याचा प्रभाव जाणवला. तब्बल पाचशे एकरापेक्षा जास्त शेतीचे नुकसान व अनेक जनावरे मृत पडली तर शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्वामी चिंचोली परिसरातील मुख्य रस्ताच वाहून गेल्याने आजही या गावांमध्ये जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे, तर आपत्कालीन व्यवस्थेला पाचारण करून अनेकांचे जीव वाचवण्यात आले आहेत.
ठेकेदारावर कारवाई:
मळद येथील या साठवण तलावाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर त्वरित कारवाईची मागणी करण्यात येत आहे. कुठल्याही तांत्रीक बाबींची पूर्तता न करताच या तलावाचे काम पूर्णत्वास गेलेच कसे हा प्रश्न उपस्थीत होत आहे. तलाव भरल्यानंतर पाणी वाहून जाण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या सांडव्याचे नियोजन चुकले आहे तर भराव टाकताना देखील मोठ्या प्रमाणात फक्त मातीचाच वापर असल्याचे आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
वास्तवीक तलावाला भेट नाहीच:
मळद परिसरातील हा तलाव ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत जाण्यासाठी आजही वाट उपलब्ध नाही त्यामुळे फक्त परिसराची पाहणी करण्यावरच समाधान मानावे लागले, तर शेकडो नागरिकांना आजही मुख्य रस्त्याकडे येता आलेले नाही. यापूर्वीच खासदार सुप्रीया सुळे, आमदार राहुल कुल यांनी पाहणी केलेली आहे त्यामुळे नेत्याचे दौरे फक्त आश्वासन आहेत का हे येणाऱ्या काळात प्रशासनाच्या हालचालीवरून पहावयास मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: