NEET उत्तरपत्रिकेत मोठा घोटाळा? विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर चौकशीची मागणी!

26
NEET OMR Sheet Tampering Controversy
विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर चौकशीची मागणी;

NEET OMR Sheet Tampering Controversy: वैद्यकीय प्रवेशासाठीच्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) मोठा घोटाळा झाल्याचा आरोप देहूरोड येथील विद्यार्थिनी मुस्कान वसीम शेखने केला आहे. तिच्या NEET उत्तरपत्रिकेत (OMR Sheet) खाडाखोड करून ती बदलण्यात आल्याचा धक्कादायक दावा तिने केला आहे. या गंभीर प्रकारामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी तातडीने चौकशीची मागणी केली आहे.

मुस्कानने दिलेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (NTA) तिची OMR शीट आणि उत्तरपत्रिका ऑनलाइन प्रसिद्ध केली. मात्र, लॉग-इन करून तिने तपासणी केली असता, त्यावर दाखवलेली OMR शीट तिची नव्हती. या शीटवर अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे हा प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट होत आहे.

या आहेत प्रमुख त्रुटी;

  • शीटवरील विद्यार्थिनीच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे आणि हस्ताक्षर दुसऱ्याचे आहे.
  • मुस्कानच्या आईचे नाव नसीम शेख असताना, शीटवर असिफा शेख असे लिहिले आहे, जे जुळत नाही.
  • सर्वात धक्कादायक म्हणजे, रोल नंबर खाडाखोड करून बदललेला दिसत आहे.
  • स्वाक्षरी बनावट किंवा कॉपी केलेली असल्याचा संशय आहे.
  • शीटवरील बोटाचा ठसा (Thumb Impression) जुळत नाही.

या सर्व प्रकाराबाबत मुस्कानने रावेत पोलिस ठाण्यासह केंद्रीय प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, दखल घेतली जात नसल्याने तिने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे धाव घेतली. सुप्रिया सुळे यांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ‘X’ (ट्विट) द्वारे NTA आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “NEET मध्ये असे प्रकार होत असतील तर प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.” राज्यसभा खासदार फौजिया खान यांनीही या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.

या गंभीर आरोपांमुळे NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. NTA यावर काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे