नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२३ :जगभरात अनेक दिग्गज टेक कंपन्यांच्या सीईओ पदाची जबाबदारी भारतीय किंवा भारतीय वंशाचे लोक पार पाडत आहेत. यामध्ये गूगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम यासारख्या कंपन्या असून, या लिस्टमध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबच्या व्यवस्थापकीय संचालक (CEO) पदी भारतीय वंशाचे नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी नील मोहन हे यूट्यूबचे सीपीओ होते. त्यांना बढती देऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुसान वोजिकी यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यूट्यूबची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट इंकने गुरुवारी ही माहिती दिली. त्यानंतर सुसान यांच्या जागी आता भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे सीईओ असतील.
- कोण आहेत नील मोहन ?
नील मोहन स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहेत. नीलने ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टसह त्याच्या करिअरची सुरुवात केली. यूट्यूब, TV, YouTube Music आणि Premium आणि Shorts व्हिडिओंसह काही सर्वात मोठी उत्पादने लाँच करण्यात मोहन यांचा मोलाचा वाटा आहे. मोहन यांनी मायक्रोसॉफ्टमध्येही काम केले आहे. तसेच नील मोहन हे स्टिच फिक्स, जीनोमिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी 23andMe च्या बोर्डवर देखील आहेत. मोहन यांनी सुमारे सहा वर्षे डबलक्लिकमध्येही काम केले आहे. याशिवाय नील यांनी एक्सेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.