नेपाळ विमान अपघात : को-पायलट पदावरून ‘कॅप्टन’ पदी पोहचणार होत्या अंजू

काठमांडू, १६ जानेवारी २०२३ : नेपाळमध्ये रविवारी झालेल्या विमान अपघातात एकूण ७२ प्रवाशांपैकी ६८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच भारतीयांचा देखील समावेश आहे. वरिष्ठ कॅप्टन कमल के. सी. आणि को-पायलट अंजू खतिवडा हे या अपघातग्रस्त विमानाचे चालक होते. यापैकी अंजू खतिवडा या आपले ध्येय गाठण्यापासून अवघ्या काही सेंकद दूर होत्या मात्र, त्या पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कॅप्टन होण्याच्या उद्देशाने अंजू यांनी वरिष्ठ पायलट आणि प्रशिक्षक कमल के. सी. यांच्यासोबत उड्डाण घेतले होते. पायलट (कॅप्टन) होण्यासाठी किमान शंभर तासांच्या उड्डाणाचा अनुभव आवश्यक असतो. को-पायलट अंजू या आपल्या या ध्येपासून काही मिनिटे दूर होत्या. या पूर्वी त्यांनी नेपाळमधील जवळपास सर्व विमानतळांवर यशस्वीपणे लँडिंग केले होते. आजच्या यशस्वी लँडिंगनंतर अंजू यांना चीफ पायलटचा परवाना मिळणार होता. मात्र, या ध्येयापासून अवघ्या दहा सेकंद दूर असताना अंजू यांचे विमान आणि स्वप्नं धुरात विरले.

  • अंजू यांच्या पतीचा १६ वर्षांपूर्वी विमान अपघातामध्येच मृत्यू

धक्कादायक म्हणजे १६ वर्षांपूर्वी यांचे दिवंगत पती दीपक पोखरेल यांचा देखील एका विमान अपघातामध्येच मृत्यू झाला होता. २१ जून २००६ रोजी झालेल्या यती एअरलाइन्सच्या विमान अपघातात अंजू यांनी आपला जोडीदार गमावला होता. नेपाळगंजहून सुरखेत मार्गे जुमला येथे जात असताना यती एअरलाइन्सचे 9N AEQ विमान कोसळले होते. या अपघातात सहा प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स ठार झाले होते. मारल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये अंजू यांचे पती दीपक पोखरेल यांचाही समावेश होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा