नेपाळ, १९ एप्रिल २०२३: नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे त्यांना बुधवारी उपचारासाठी विमानाने भारतात आणण्यात आले आहे. त्यांना श्र्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांना पुढील उपचारासाठी भारतात विमानाने नेण्यात आल्याचे सांगण्यात आलं.
रामचंद्र पौडेल (वय.७८) यांना मंगळवारी नेपाळमधील टीयू टिचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना छातीत जंतूसंसर्ग झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्यावर नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे उपचार होणार आहेत. असे त्यांच्या प्रेस सल्लागाराकडून सांगण्यात आलं.
राष्ट्रपती यांचे सल्लागार किरण पोखरेल यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास राष्ट्रपतींना एअर रुग्णवाहिकेमधून भारतात आणण्यात आले. त्यांच्यासोबत मुलगा चिंतन पौडेल आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री पूर्ण बहादुर खडका यांच्यासह इतर नेत्यांनी मंगळवारी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर