इस्रायलमध्ये पुन्हा नेतन्याहू सरकार…

9

पुणे, ४ नोव्हेंबर २०२२: पुन्हा एकदा बेंजामिन नेतन्याहू इस्रायलचे पंतप्रधान होणार आहेत. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांनी नेतन्याहू यांचा पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. ते पाचव्यांदा इस्रायलच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नेतन्याहू यांचं अभिनंदन केलंय. बेंजामिन नेतन्याहू यांनीही पीएम मोदींच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘माझ्या मित्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुमचे आभार, मी इस्रायल आणि भारत यांच्यात सतत सहकार्यासाठी उत्सुक आहे.’

नेतन्याहूंना सतत स्पर्धा देणारे विद्यमान पंतप्रधान आणि त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी यायर लॅपिड यांनीही आपला पराभव स्वीकारला. नेतन्याहू यांच्या आघाडीला १२० पैकी ६४ जागा मिळतील असं सांगितलं जातंय. टाईम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, लॅपिड यांनी नेतन्याहू यांना फोन करून विजयाबद्दल अभिनंदन केलं. लॅपिड यांनी नेतन्याहू यांना सांगितलं की त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील सर्व विभागांना पद्धतशीरपणे सत्ता हस्तांतरित करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिलेत.

वास्तविक, इस्रायलच्या संसदेत १२० जागा आहेत. नेतन्याहू यांचा लिकुड पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यापैकी ६४ जागा जिंकतील असा अंदाज आहे. इस्त्रायलचं राजकारण पूर्णपणे युतीवर आधारित आहे. इथं कोणत्याही एका पक्षाला संसदेत बहुमत मिळू शकत नाही. त्यामुळं सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

निकाल लागण्यापूर्वी नेतन्याहू यांनी लिकुड पक्षाच्या निवडणूक मुख्यालयात आपल्या समर्थकांना संबोधित केलं. ते म्हणाले की, आम्ही मोठ्या विजयाच्या वाटेवर आहोत. इस्रायलमध्ये २०१९ पासून राजकीय अस्थिरता आहे. येथे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या नेतन्याहू यांना लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर त्यांना पायउतार व्हावं लागलं. या निवडणुकीत नेतन्याहू यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी यायर लॅपिड होते. नेतन्याहू यांना सत्तेवरून हटवण्याचं संपूर्ण षडयंत्र त्यांनीच केलं.

कशा होतात इस्रायलमध्ये निवडणुका?

१२० जागांच्या इस्त्रायली निवडणुकीत, ज्या पक्षाला सर्वाधिक मतदान होतं, त्याच्या विजयाची शक्यता जास्त असते. खरं तर इस्रायलमधील लोक कधीही कोणत्याही उमेदवाराला मत देत नाहीत, त्यांच्या बाजूनेच पक्षाला मतदान केलं जातं. जर कोणाला संसदेत जागा हवी असंल तर राष्ट्रीय मताच्या किमान ३.२५% आवश्यक आहेत. म्हणजेच इस्त्रायलमध्ये प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन असलेली निवडणूक प्रणाली चालते, जिथं पक्षाला मिळणाऱ्या मतांच्या संख्येनुसार जागा मिळतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे