टक्कल व्हायरसचा नवा कहर: केस परतले, डोळ्यांना धोका

88

पुणे ३० जानेवारी २०२५ : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावात काही दिवसांपूर्वी “टक्कल व्हायरस” मुळे अनेकांच्या केसांचे मोठ्या प्रमाणात गळणे सुरू झाले होते. अचानक केस गळून टक्कल पडू लागल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ही बाब राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली होती.

या गंभीर समस्येवर अनेक संशोधन व तपासण्या करण्यात आल्या, मात्र याचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, गावातील काही नागरिकांनी एक विशिष्ट औषध वापरल्यानंतर त्यांचे केस पुन्हा उगवू लागले, यामुळे काहीसा दिलासा मिळाला. पण आता नव्या समस्येने लोक चिंतेत अडकले आहे.

ज्यांना पूर्वी केस गळतीचा त्रास झाला होता, त्यांना आता डोळ्यांचे विकार जाणवू लागले आहेत. काहींना दृष्टी धूसर होत असल्याचा अनुभव येत आहे, तर काही जणांना सतत डोळ्यांमध्ये जळजळ, पाण्याचा त्रास आणि दृष्टी कमजोर होत असल्याची तक्रार आहे. या नव्या समस्येचं कारण काय असू शकतं, हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ आता अधिक संशोधन करत आहेत.

या अनोख्या आणि रहस्यमय प्रकृती बदलांमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यावर अधिक माहिती घेत असून, नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे