पुण्यात नवीन निर्बंध लागू….

पुणे, १८ एप्रिल २०२१: पुण्यात कोरोना आरोग्य यंत्रणा हतबल झालेली असताना, काही अतिउत्साही पुणेकरांना घराबाहेर पडण्याचा मोह आवरता येत नाहीये. वीकेंड लॉकडाऊनच्या दिवशीही संचारबंदीच्या नियमांचे उल्लघंन काहीनी केल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोना प्रतिबंधक नियम लागू केलेले असूनसुद्धा पुण्यात रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. नव्या रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे पुण्यात आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने नवे नियम जारी केले आहेत. शुक्रवारी देखील अजित पवारांनी याबाबत पुणेकरांना संकेत दिले होते.

वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहणार

पुण्यातील वाढती रुग्णांची संख्या पाहता अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आता कोरोना चाचणीचे बंधन नसेल. पुण्यात पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहतील, अशी माहिती पुण्याचे सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. पुण्यात आता शनिवार आणि रविवारी फक्त मेडिकलची दुकान सुरु ठेवण्यास परवानगी आहे.

पार्सल सेवा देण्यास मुभा

पुण्यात खानावळींना पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे. खानावळी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पार्सल सेवा देऊ शकतात.

मद्यविक्रीला होम डिलिव्हरी अटीवर परवानगी

पुणे पालिकेने मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, फक्त होम डिलिव्हरी करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. नव्या नियमानुसार आता सोमवारी ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मद्य विकण्यास मुभा असेल.

चष्म्याच्या दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी

संचारबंदीच्या काळात मेडिकल, रुग्णालये वगळता इतर बहुतांश बाबींवर बंदी आणण्यात आली होती. यामध्ये चष्म्याची दुकानंसुद्धा बंद करण्यात आली होती. मात्र आता पालिकेच्या नव्या नियमांनुसार चष्म्याची दुकानं सोमवारी ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. या नव्या नियमांमुळे दृष्टीदोष असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा