नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2021: लखनौ फॉरेन्सिक सायन्स लॅबनं (एफएसएल) लखीमपूर खेरी प्रकरणात जप्त केलेल्या शस्त्रांचा बॅलिस्टिक अहवाल एसआयटीकडं सोपविलाय. एसआयटीने पाठवलेल्या चारपैकी तीन शस्त्रे गोळीबार झाल्याची पुष्टी एफएसएलने केली आहे. लखनौ झोनचे डीजी / एडीजी एसएन सबत यांनी सांगितलं की एफएसएलने एसआयटीला आपला अहवाल दिलाय. अहवालानुसार एसआयटी पुढील कारवाई करेल.
मिळालेल्या माहितीनुसार, चार शस्त्रे एसआयटीने एफएसएलकडे तपासासाठी पाठवली होती. यामध्ये रिपीटर गन आणि पिस्तूल अंकित दास या दोन शस्त्रास्त्रांचा समावेश आहे तर अन्य दोन शस्त्रे रिव्हॉल्व्हर आणि रायफल गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्याकडे आहेत. रिपीटर बंदूक, पिस्तूल आणि रायफलमधून गोळीबार झाल्याची पुष्टी झाल्याचे सूत्रांचं म्हणणं आहे. आशिष मिश्रा यांनी दावा केला होता की, एका वर्षाहून अधिक काळ आपण आपल्या शस्त्राने गोळीबार केला नाही. पण एफएसएलच्या अहवालात आशिष मिश्रा यांचा दावा चुकीचा ठरलाय.
आशिष सध्या लखीमपूर खेरी कारागृहात आहे. लखीमपूर घटनेत 3 ऑक्टोबर रोजी आशिष आणि आशिषचा साथीदार अंकित दास यांच्या शस्त्रांमधून गोळी झाडण्यात आली होती हे एसआयटीला सिद्ध करावं लागेल. लखीमपूर घटनेत गोळीबार झाल्याचा पोलिस सुरुवातीला इन्कार करत होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काडतुसेही जप्त केली. बॅलेस्टिक अहवाल आल्यानंतर आता लखीमपूर प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा आणि त्याचा सहकारी अंकित दास यांच्यासमोर अडचणी निर्माण होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली तीव्र नाराजी
या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य सरकारनं सोमवारी दाखल केलेल्या स्टेटस रिपोर्टवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सुप्रीम कोर्टाने खरडपट्टी काढत संपूर्ण तपासावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. लॅबच्या अहवालावर सुप्रीम कोर्टानेही भाष्य केलं होतं. शस्त्रांसोबतच एसआयटीने काही मोबाईल फोनही फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठवले होते. मोबाईल फोनचा अहवाल येणे बाकी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे