राज्य सरकारचे नवे निर्बंध, विवाहसोहळ्यांत 50 जणांनाच परवानगी; समुद्रकिनारे, चौपाटय़ांवर बंदी

13

मुंबई, 31 डिसेंबर 2021: महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने अखेर गुरुवारी रात्री ठाकरे सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. राज्य सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत.

या नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय अंत्यसंस्कारात 20 तर लग्नसोहळ्यात फक्त 50 जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. कोरोनाची स्थिती पाहता स्थानिक प्रशासनाला आणखी कठोर निर्बंध लागू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. हे सर्व निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमलात येतील. बैठकीस आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, करोना कृती दलाचे डॉ़ संजय ओक, डॉ़ शशांक जोशी, डॉ़ अजित देसाई, डॉ़ राहुल पंडित आदी उपस्थित होते.

काय आहेत नवे निर्बंध?

  1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी
  2. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
  3. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
  4. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू
  5. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
  6. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.

गर्दी टाळा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा