साउथैम्पटन, २४ जून २०२१: न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ८ गडी राखून पराभुत करत इतिहास रचलाय. न्यूझीलंड कसोटी चा जागतिक विजेता ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली ट्रॉफी त्याने जिंकली आहे.
न्यूझीलंडने ४५.५ षटकांत दोन गडी गमावून १३९ धावांचे लक्ष्य गाठले. न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने कर्णधारपदाचा डाव खेळला. त्याने नाबाद ५२ धावा केल्या. विल्यमसनला अनुभवी फलंदाज रॉस टेलरने (नाबाद ४७) चांगला पाठिंबा दिला. तिसर्या विकेटसाठी दोघांनी ९६ धावांची भागीदारी केली. भारता कडून आर. अश्विनने न्यूझीलंडच्या दोन्ही विकेट घेतल्या.
१३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने सावधगिरीने सुरुवात केली. टॉम लाथम आणि डेव्हन कॉनवेच्या जोडीने ३३ धावांची भर घातली. रविचंद्रन अश्विनने १४ व्या षटकातील तिसर्या चेंडूवर टॉम लाथम (९) यांना ऋषभ पंतने झेल देऊन भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
यानंतर त्याने दुसऱ्या सलामीवीर डेव्हन कॉनवेला (१९) आपला बळी बनवले. कॉनवेच्या बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी पुढाकार घेतला. आक्रमक फलंदाजी करताना टेलरने दबाव दूर करण्यात मोठी भूमिका बजावली.
कोहली आणि पुजारा फ्लॉप ठरले
तत्पूर्वी, भारताने सकाळी २ गडी राखून ६४ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. दिवसाच्या पहिल्याच तासात भारताच्या दोन विकेट पडल्या. कर्णधार विराट कोहली (२९ चेंडूंत १३ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (८० चेंडूंत १५ धावा) काइल जेम्सनचा बळी ठरला.
दुसऱ्या सत्रातही भारतीय फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. भारताच्या डावात रोहित शर्माने ३० धावा केल्या, शुभमन गिल ८, रवींद्र जडेजा १५, रविचंद्रन अश्विन सात, मोहम्मद शमी १३ आणि जसप्रीत बुमराह खाते न उघडता बाद झाला तर ईशांत शर्मा एका धावावर नाबाद राहिला.
भारतीय संघाने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने २४९ धावा केल्या आणि ३२ धावांची आघाडी घेतली. भारताचा दुसरा डाव १७० धावांवर संपला आणि भारताने कीवी संघाला १३९ धावांचे लक्ष्य दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे