बिहार, ६ फेब्रुवारी २०२३ : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बिहार पोलिसांच्या सहकार्याने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) फुलवारी शरीफ प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात राज्यातील मोतीहारी येथून आणखी दोन जणांना अटक केली आहे. तनवीर रझा आणि मोहम्मद आबीद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, ते पूर्व चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गेल्या शनिवारी एनआयए आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोतीहारीमध्ये ‘पीएफआय’शी संबंधित संशयित दोन जणांना अटक केली.
‘एनआयए’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या अटकेमुळे जातीय सलोखा बिघडविण्याचा ‘पीएफआय’ मॉड्युलचा कट उघड झाला आहे. बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील आठ ठिकाणी गेल्या शनिवारी ‘पीएफआय’ कार्यकर्त्यांनी हत्येचा कट उधळून लावला होता.
निवेदनात म्हटले आहे, की ‘एनआयए’ने रविवारी आणखी दोन आरोपींना अटक केली, ज्यांनी हत्येसाठी शस्त्रे आणि दारूगोळ्याची व्यवस्था केली होती. घटनेची अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वीच रेकी करण्यात आली होती. त्यानुसार, ‘पीएफआय’ कॅडरसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करणाऱ्या याकूब या ‘पीएफआय’ प्रशिक्षकाकडे शस्त्रे आणि दारूगोळा सुपूर्द करण्यात आला.
केंद्राने अधिसूचनेत म्हटले होते, की बंदीची शिफारस उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्य सरकारांनी केली होती. बंदीमागची कारणे स्पष्ट करताना, गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे, की ‘पीएफआय’ आणि त्याच्या संलग्न कंपन्या देशाच्या अखंडता, सार्वभौमत्व आणि सुरक्षेला बाधक बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये सहभागी आहेत. उल्लेखनीय आहे, की गेल्यावर्षी ‘एनआयए’ने ‘पीएफआय’शी संबंधित सुमारे ३५० लोकांना देशाच्या विविध भागांतून अटक केली होती. केंद्रीय तपास यंत्रणांना संघटनेच्या विरोधात पुरेसे पुरावे मिळाले, त्याआधारे या संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड